कांद्याला योग्य भाव नाही, कांदा फेकून शेतकर्‍यांनी शासनाचा केला निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मलकापूर 

भाजप सरकारने शेतकर्‍यांची क्रूर थट्टा चालविली असून आता कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी सरकार विषयी नाराजी व्यक्त करीत ट्रॅक्टर मधून कांदा आणून तो कांदा तहसील कार्यालयासमोरील तहसील चौकात फेकला. तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने मलकापूर तालुका व शहर काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी कांदा तहसील चौकात आणून निषेध म्हणून कांदा रस्त्यावर फेकला.

यावेळी शेतकर्‍यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, शहराध्यक्ष राजु पाटील, प्रमोद अवसरमोल, रणजीत डोसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. सरकार विरोधी नारे देऊन सरकारने शेतकर्‍यांची चालविलेली थट्टा थांबवून शेतकर्‍यांच्या सर्व मालाला योग्य भाव द्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. कांदा फेक आंदोलन कर्त्यांना शहर पोलिसांनी अटक करुन वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहतूक सुरळीत केली.