पती-पत्नीच्या वादाची ऑनलाईन सुनावणी; हायकोर्टाने अर्ज करण्याचे दिले आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पती-पत्नीच्या वादावर ऑनलाईन सुनावणी होऊ शकते. त्यामुळे या सुनावणीसाठी पतीने लातूर न्यायालयात अर्ज करावा. त्यावर लातूर न्यायालयाने निर्णय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात ऑनलाईन सुनावणी घेण्याचे निर्देश स्थानिक न्यायालयाला दिले आहेत. परिणामी या पती-पत्नीच्या वैवाहिक हक्क दाव्यावर ऑनलाईन सुनावणी होऊ शकते, असे न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.

लातूर न्यायालयात सुरू असलेली ही सुनावणी पुणे न्यायालयात वर्ग करावी, अशी मागणी करणारा अर्ज पतीने दाखल केला होता. पत्नी आणि मी पुण्यात नोकरीला आहोत. तेव्हा ही सुनावणी पुणे न्यायालयात झाल्यास दोघांसाठी सोयीस्कर होईल, असा दावा पतीने केला.

पत्नीने याला विरोध केला. मी पुण्यात कामाला आहे. मात्र मी माझ्या लातूरमधील घरातून वर्कफ्रॉम होम करते. आठवडय़ातून एकदाच पुणे कार्यालयात जाते. लातूरपासून पुणे 370 किमी अंतरावर आहे. एवढा प्रवास शक्य होणार नाही, असे पत्नीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले.

कंपनीचा खुलासा

पत्नी काम करत असलेल्या कंपनीकडे न्यायालयाने तिने केलेल्या दाव्याचे उत्तर मागितले होते. त्यानुसार कंपनीने खुलासा केला. ही महिला कर्मचारी आमच्या कंपनीत नोकरी करते. ती सध्या वर्कफ्रॉम होम काम करते, असे कंपनीने न्यायालयाला सांगितले.