
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जेट एअरवेजकडे देशांतर्गत उड्डाणांसाठी फक्त 15 विमाने शिल्लक आहेत. जेट एअरवेज सध्या देशातील सर्वात छोटी एअरलाइन्स झाली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबतही जेटची अशीच परिस्थिती आहे. कर्जाच्या बोजा असलेल्या कंपनीने पायलट आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या सुटीवर जाण्यास सांगितले आहे. तर काहीजणांना बिनपगारी रजा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी आवश्यक असलेली विमाने जेट एअरवेजकडे नसल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 20 एअरक्राफ्ट आणि 120 दैनंदिन फ्लाइट असण्याची गरज आहे. मात्र, जेटकडे सध्या देशांतर्गत उड्डाणांसाठी फक्त 15 विमानेच शिल्लक आहेत. तीन महिने जेटच्या विमान सेवेचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. जेट एअरवेजकडे सध्या 29 टेन 737एनजी, सात एटीआर टर्बोप्रॉप्स आणि 12 एअरबस ए 330 आणि बोइंग 777 विमाने आहेत. डिसेंबरमध्ये जेटकडे 124 विमाने होती. मात्र, आर्थिक अडचणीमुळे जेटने काही विमाने बंद केली आहेत. चार ए 330 आणि बोइंग 777 विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरली जातात. तर 737 एनजी विमाने जवळच्या देशात उड्डाणे करतात.आगामी काळात जेटकडील विमानांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या जेटकडून दिवसभरात देशांतर्गत 5 ते 10 विमानफेऱ्या होतात. देशातील सगळ्यात छोटी एअरलाइन्स असणाऱ्या विस्ताराच्या 20 ते 22 फेऱ्या होतात. त्यामुळे जेट आता देशातील सर्वात छोटी विमान कंपनी झाली आहे. मात्र, काही माध्यमे चुकीचे वृत्त देत असून जेट एअरलाइन्सची स्थिती चांगली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Jet Airways: Would like to clarify certain speculative media reports with regard to airline’s ability to operate on international routes. As informed to DGCA,airline is operating a curtailed schedule with sufficient number of aircraft, and is compliant with applicable guidelines pic.twitter.com/ldVoXyLvOQ
— ANI (@ANI) April 3, 2019
आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. आमच्याकडे अजूनही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्याचे अधिकार आहेत असे जेटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. काही महिन्यांचा पगार रखडल्याने जेटच्या वैमानिकांनी संपाचा इशारा दिला आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअरलाइन्स बँकांकडून कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अजूनपर्यत कोणताही मार्ग निघाला नसल्याने जेटने वैमानिकांना मोठ्या सुटीवर जाण्यास सांगितले आहे. जेटला बँकांकडून कर्ज मिळाले नाही तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांची आंतराराष्ट्रीय उड्डाणेही रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

























































