…तर पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरू! उघडय़ा मॅनहोल्सच्या समस्येवर हायकोर्टाची गंभीर भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील उघडय़ा मॅनहोल्सच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा बृहन्मुंबई महापालिकेचे कान टोचले. तुम्ही उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी आतापर्यंत जे प्रयत्न केले, त्याचे आम्ही कौतुक करतो. मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत जर कुणी उघडय़ा मॅनहोल्समध्ये पडले वा इतर कुठली अनुचित घटना घडली, तर त्या नुकसानीसाठी थेट पालिका अधिकाऱयांनाच जबाबदार धरले जाईल, अशी स्पष्ट तंबी न्यायालयाने दिली. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देशही पालिका प्रशासनाला दिले.

राज्यभरातील बहुतांशी रस्त्यांवर असलेले खड्डय़ांचे साम्राज्य तसेच मुंबई शहरातील उघडय़ा मॅनहोल्सच्या समस्येकडे लक्ष वेधणाऱया अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी पालिका प्रशासनाला कडक शब्दांत फटकारताना शहरातील उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी पालिकेला आठवडाभराचा अल्टिमेटम दिला होता. त्या अनुषंगाने बुधवारी पालिकेतर्फे अ‍ॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली. पालिका प्रशासनाकडून उघडय़ा मॅनहोल्सची समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सर्व मॅनहोल्स झाकण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे साखरे यांनी सांगितले. त्यावर पालिकेच्या या प्रयत्नांचे खंडपीठाने कौतुक केले. मात्र मॅनहोल्स झाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी पालिका प्रशासनच जबाबदार राहील. आम्ही पीडित व्यक्तीला नुकसानभरपाईसाठी दिवाणी खटला दाखल करण्यास सांगणार नाही, तर थेट पालिका अधिकाऱयांनाच जबाबदार धरू, असे बजावले. शहरातील उघडय़ा मॅनहोल्सच्या समस्येची न्यायालयाला चिंता आहे. पालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असेही खंडपीठाने सूचित केले. याप्रकरणी 19 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

आधुनिक विचार करा; सगळ्या गोष्टी आम्ही सांगू शकत नाही!
मॅनहोल्सची समस्या सोडवण्यासाठी जुन्याच तंत्रज्ञानामध्ये चाचपडत बसण्याच्या पालिकेच्या कार्यपद्धतीवरही न्यायालयाने खडे बोल सुनावले. आपण आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पालिका थोडा आधुनिक विचार करू शकत नाही का? मॅनहोल्सच्या समस्येवर काय केले पाहिजे, याबाबत आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत बसणार नाही. तुम्ही स्वतः आधुनिक विचार केलाच पाहिजे, हे तुमचे कर्तव्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरा. मॅनहोलचे झाकण कुणी उघडले तर लगेचच संबंधित अधिकाऱयाच्या कार्यालयात बीप वाजून प्रशासन सतर्क होईल, यासाठी तुम्ही सेन्सॉरसारख्या व्यवस्थेचा विचार का करीत नाहीत, असे विविध प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. याचवेळी मॅनहोलच्या कव्हरच्या खाली लोखंडी ग्रील्स वापरण्याची सूचनाही केली.