
सामना प्रतिनिधी, नागपूर
दुधाच्या दराबाबत सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामधील शाब्दिक चकमक सुरूच होती. यावेळी विरोधकांनी ‘दुधाला पाच रुपये भाव मिळालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी सुरू केली.
दूध दरावरून राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल मुंडे यांनी केला. एका दूध उत्पादक शेतकऱ्याने फोन करून जानकरांना आपल्या मागण्यांबाबत विचारल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या ५५ वर्षांच्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेले. शेतकऱ्यानी तुम्हाला जाबही विचारायचा नाही का, असा प्रश्नमुंडे यांनी केला.
परप्रांतातील दुधावर कर लावा
शेतकऱ्याना प्रतिलिटर पाच रु. देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रॅण्डची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखले पाहिजे. दूधवाटपात ४० टक्के वाटा सहकारी तर ६० टक्के दूध खासगी आहे. दुधाचे ब्रॅण्ड कमी करून शासनाचा एक ब्रॅण्ड करावा तरच ग्राहकांची व शेतकऱ्याची लूट थांबेल, याकडे शिवसेनेच्या उपनेत्या आमदारडॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.
विरोधकांची घोषणाबाजी
दुधाच्या प्रश्नासंदर्भात राजू शेट्टी यांच्यासह सर्वांशी चर्चा केली आहे. अजूनही सर्वांशी चर्चा करण्याची तयारी आहे. शेतकऱ्याना ऑनलाइन पैसे देता येणार नाही असे जानकर म्हणाले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून त्वरित बैठक घेण्याचे आदेश दिले. यानंतरही समाधान न झाल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
































































