शिक्षण विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष; 15 जूनआधीच अनेक शाळांमध्ये वर्ग भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाकडे अनेक शाळांनी दुर्लक्ष केले असून 15 जूनआधीच मुंबईतील शाळांमध्ये वर्ग भरले आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करून 15 जूनपासून प्रत्यक्ष वर्ग भरविण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. मात्र मुंबईतील बहुसंख्य शाळांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करीत नियोजित वेळेनुसार म्हणजेच आज सोमवारपासूनच विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळा सुरू केली.

मुंबई महापालिकेसह काही खासगी शाळांमधील वर्ग सोमवारपासूनच सुरू झाले. शाळांनी वार्षिक परीक्षेचे निकालपत्र देतेवेळीच 13 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे पालकांना कळविले होते. त्यानुसार मुंबईतील काही खासगी शाळा आजपासूनच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या. मुंबई महापालिकेच्या शाळादेखील सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले. शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली होती. शाळांचे सॅनिटायझेशन, स्वच्छता ही कामे वेळेत झाल्याने तसेच संपूर्ण शिक्षक आणि कर्मचारीवर्गदेखील शाळेत उपस्थित असल्याने महापालिकेच्या शाळा सुरू करण्यात आल्याचेही तडवी यांनी स्पष्ट केले. येत्या आठवडाभरात सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱया 27 वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

मास्कचा वापर, हात धुणे, सॅनिटायझर्स वापराची सवय असू द्या

मुंबई आणि परिसरात मागील बराच काळ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझर्सच्या वापराची सवय सुटली होती. मात्र ऐनपावसाळ्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शाळेत जाणाऱया विद्यार्थ्यांना पालकांनी मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझर्स वापराची सवय लावण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्येही शाळेत जाण्याची ओढ असून सध्या नवे दप्तर, नवा गणवेश, नवा रेनकोट, नव्या कोऱया वह्यांची खरेदी सुरू आहे. आधीची दोन वर्षे पावसाळ्यात शाळा बंद असल्याने रेनकोट आणि पावसाळी चपलांची खरेदी केली नव्हती. यंदा मात्र गणवेशाबरोबरच रेनकोट, पावसाळी चपला खरेदीसाठी गर्दी होत आहे. राज्यातील शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून 15 जूनपासून प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये तयारी सुरू असून शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य देऊन करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहावे, याची काळजी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनो, ही काळजी घ्या

  •   शाळेत, स्कूलबसमध्ये, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
  •   शक्यतो स्वतःचे शैक्षणिक साहित्य वापरा.
  •   सोबत पाण्याची बाटली असू द्या.
  •   हात धुणे, सॅनिटायझर्सचा वापर वेळोवेळी करा.
  •   बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.
  •   सर्दी, ताप, खोकला असल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.
  •   12 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य द्यावे.

 मुंबईतील सर्व शाळांमध्ये पोहोचली पाठय़पुस्तके

मुंबईतील सर्व शाळांमध्ये सर्व इयत्तांची पाठय़पुस्तके पोहोचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शासन निर्णयानुसार 15 जूनला विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके दिली जातात. मुंबई विभागातील एकूण 10 हजार 610 शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या एकूण 76 लाख 61 हजार 361 पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.