रोनाल्ड चौहानची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयमी खेळ आणि निर्णायक क्षणी केलेल्या सरस कामगिरीच्या जोरावर ठाण्याच्या रोनाल्ड चौहानने चौथ्या एमआयजी क्रिकेट क्लब आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजयी आगेकूच केली. तसेच सूर्यकांत मोरे, संतोष डोखे यांनीही विजयी सलामी दिली.

वांद्रे येथे सुरू झालेल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत रोनाल्डने मुंबईच्या अमित कदमला 23-10, 8-23, 16-10 असे नमवित दुसरी फेरी गाठली. मुंबईच्या सूर्यकांत मोरेनेही चुरशीच्या लढतीत मुंबई उपनगरच्या गोविंद चुरीवर 8-23, 25-11, 20-13 अशी मात केली. पहिल्या सेटमधील पिछाडी भरून काढत सूर्यकांतने पुढील दोन्ही सेट जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. दरम्यान, संतोष डोखेने अजय अमरेला 25-16, 25-0 असे हरविले. प्रफुल राठोडने चंद्रकांत तुपलोंढेवर 25-5, 25-7 अशी मात केली.

स्पर्धेचे उद्घाटन क्लबचे इनडोअर सचिव निनाद बोरकर यांच्या हस्ते बोर्डवरील फित कापून करण्यात झाले. यावेळी क्लबचे सचिव निशांत पाटणकर, ट्रस्टी संजय फातर्पेकर, क्रिकेट विभाग सचिव अमित दाणी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार आणि खजिनदार अजित सावंत उपस्थित होते.