हस्तकौशल्याची पालखी, केरळपासून आसामपर्यंतचे कारागीर एकाच छताखाली; पद्मजा लाखे यांचा स्तुत्य उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाकडी वस्तू, महाबलीपुरम येथील दगडाच्या वस्तू, मध्य प्रदेशातील गोंड पेंटिंग, राजस्थान-पाकिस्तानच्या सीमेवरील गावांतील ब्ल्यू पॉटरी, राजस्थानची लाकडी कवाडं, गाझियाबादचे मेटल प्रोडक्ट, पाँडेचरी येथील करवंटीपासून तयार केलेल्या कलाकृती ‘पालखी’ स्टोअरमध्ये आहेत.

देशाच्या विविध प्रांतांतील हस्तकौशल्यांना मार्केट मिळवून देण्याचा  प्रयत्न पुण्याच्या पद्मजा भिडे लाखे करत आहेत. विविध राज्यांमध्ये फिरून हस्तकौशल्याच्या वस्तू आणि त्यांची निर्मिती करणारे कारागीर यांचा शोध घेत आहेत. या सगळय़ांना त्यांनी ‘पालखी’ या स्टार्टअपअंतर्गत एकत्र आणले आहे. आज केरळपासून आसामपर्यंतचे सुमारे 200 ते अडीचशे कलावंत ‘पालखी’शी जोडले गेले आहेत.

पद्मजा लाखे यांनी 26 जानेवारी 2022 रोजी हस्तकौशल्याला वाहिलेले ‘पालखी’ हे स्टोअर पुण्यात कोथरुडला सुरू केले. यामध्ये  700 प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतील. पद्मजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग क्षेत्रात 25 वर्षे काम केले. त्यांनी मागील 16-17 वर्षे आदिवासी कलेचा अभ्यास करण्यासाठी देशभर प्रवास केला. त्यातूनच त्यांनी नऊ वर्षांपूर्वी भिला हा ब्रॅण्ड सुरू केला. याअंतर्गत पद्मजा यांनी तयार केलेले हॅण्ड पेंटेंट लॅम्प खूपच लोकप्रिय झाले. अनेक सेलिब्रेटींच्या घरी त्यांचे दिवे आहेत.

आदिवासी कलेवरील प्रेमापोटी त्यांनी ‘पालखी’ या हस्तकलेच्या वस्तूचे दालन  सुरू केले. त्यांचे पती प्रवीण लाखे यांनी  आदिवासी पट्टय़ात जाऊन  वस्तू निवडून आणल्या. कलाकृती बनवणाऱया दोन ते तीन हजार कलावंतांशी त्यांचा संपर्क आहे. 25 रुपयांपासून ते एक लाखापर्यंतच्या या कलाकृती  आहेत.  त्यातून कारागीरांची कमाई होत आहे.

कोरोना काळात हस्तकला कारागीरांना मोठा फटका बसला. या कारागीरांना नव्याने उभारी देण्यासाठी आणि त्यांची कला सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ‘पालखी’च्या माध्यमातून पद्मजा लाखे प्रयत्न करीत आहेत. कलात्मक वस्तूंचा मान राखत त्यांना पालखीत ठेवून रसिकांपर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे लाखे यांनी सांगितले.