
दोन्ही सराव सामने हरणाऱ्या पाकिस्तान वर्ल्ड कपच्या सलामीच्याच सामन्यात विजयी ट्रकवर धाव घेतली. त्यांनी पहिला विजय नोंदविताना नेदरलॅण्ड्सचा 81 धावांनी सहज पराभव केला आणि आयसीसी वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामीसह आपले अभियान सुरू केले. 68 धावांची झंझावाती खेळी करणारा सऊद शकील ‘सामनावीर’ ठरला.
32 षटकांत 188 धावांवर सहा फलंदाज गमावणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद नवाज आणि शादाब खानने झुंजार खेळ केला. त्यामुळे नेदरलॅण्ड्सच्या गोलंदाजांशी संघर्ष करत त्यांनी कशीबशी का असेना 286 अशी आव्हानात्मक मजल मारली. याच शतकी धावा पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरल्या. दुसरीकडे नेदरलॅण्ड्सने विक्रमजीत सिंह (52) आणि बास डी लीडेने (67) तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागी रचत पाकिस्तानी गोलंदाजांच्या तोंडातून फेस काढला होता, पण ही जोडी फोडण्यात शादाब खानने यश मिळविले आणि मोहम्मद नवाजने बासचा त्रिफळा उडवून आपला विजयही जवळजवळ निश्चित केला.यानंतर नेदरलॅण्ड्सच्या लोगान वॅन ब्रीकने 28 धावांची खेळी केल्यामुळे तो संघाला 200 पलीकडे घेऊन पोहोचवू शकला. पाकिस्तानने डचचे शेपूट गुंडाळून आपल्या वर्ल्ड कपचा श्रीगणेशा विजयाने केला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी नेदरलॅण्ड्सच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवल्यामुळेच त्यांचा विजय सोप्पा झाला.
अपयशी सुरुवात आणि शतकी भागी
टॉस जिंकून गोलंदाजी घेणाऱ्या नेदरलॅण्ड्सच्या गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांतच फखर झमान, इमामुल हक आणि बाबर आझम यांचे विकेट घेत सामन्यावर पकड घेतली. मात्र त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सऊद शकीलने प्रत्येकी 68-68 धावा करत 120 धावांची भागी रचून पाकिस्तानी फलंदाजीला ऑक्सिजन दिले. सऊदने 52 चेंडूंत 68 धावा चोपून काढल्या. तो बाद झाल्यावर रिझवानही बाद झाला आणि पाकिस्तानची 6 बाद 188 अशी अवस्था झाली.
खेळ आकडय़ांचा
पाकिस्तानने सलग सातव्या वन डे सामन्यात नेदरलॅण्ड्सवर मात केली. तसेच वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानने डच संघाचा पराभव केला. त्याचप्रमाणे पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील 81 सामन्यांमधील आपला 46 वा विजय नोंदविला.
गोलंदाजीत 4 विकेट आणि फलंदाजीत 67 धावा करणारा बास वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात 4 विकेट आणि अर्धशतकी मजल मारणारा दहावा अष्टपैलू ठरला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ युवराज सिंग आणि शाकिब अल हसन यांनीच एका सामन्यात 5 विकेट आणि अर्धशतक ठोकले आहे.
नेदरलॅण्ड्सचा हा वर्ल्ड कपमधील 19 वा पराभव आहे. आतापर्यंत ते 21 सामने खेळले असून केवळ नामिबिया आणि स्कॉटलंड याच दोन संघांविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये जिंकले आहेत.





























































