मोदी सरकारशी चर्चा करून उपयोग नाही; पाकड्यांचा कांगावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । दुबई

हिंदुस्थानात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारसोबत हिंदुस्थान-पाकिस्तानमधील चर्चा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे पाकिस्तानचे वरिष्ठ मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले. दिल्लीतील मोदी सरकारशी चर्चा करून काहीही उपयोग नाही. या सरकारकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा नाही, असे चौधरी म्हणाले. हिंदुस्थानशी चर्चा करण्याची आता योग्य वेळ नसून प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुकांमध्ये व्यग्र आहेत, असे ते म्हणाले. हिंदुस्थानशी चर्चेचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत पाकिस्तानने नवा कांगावा सुरू केला आहे.

पाकिस्तानसाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी पाकिस्तानसाठी सकारात्मक नेता कोण आहे असे विचारल्यावर चौधरी म्हणाले हिंदुस्थानात कोणीही नेता असेल तरी पाकिस्तानला फरक पडत नाही. हिंदुस्थानात निवडणुकांनंतर आलेल्या नव्या सरकारशी चर्चा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले. दुबईमध्ये एका वृत्तवाहिनीशी केलेल्या चर्चेत चौधरी यांनी हे वक्तव्य केले आहे. मोदी सरकारकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा नाही असा कांगावाही चौधरी यांनी केला आहे. हिंदुस्थानात जोपर्यंत स्थिर सरकार येत नाही, तोपर्यंत चर्चेचे प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही. आता हिंदुस्थानशी चर्चा करण्याची योग्य वेळ नाही. हिंदुस्थानातील सर्व नेते निवडणुकांच्या तयारीत गुंतले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत वाट पाहणार असल्याचे ते म्हणाले. हिंदुस्थानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही चर्चेचे प्रयत्न थांबवले आहेत, असे ते म्हणाले. हिंदुस्थानी जनतेने निवडलेल्या कोणत्याही पक्षाशी आणि नेत्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानशी चर्चा थांबवली आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, या भूमिकेवर हिंदुस्थान ठाम असून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान चर्चेसाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवत आहे. मात्र, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे आणि कुरघोडी करण्याचे त्यांचे कारस्थान सुरुच आहे.