
पनाडे धरणाने तळ गाठल्यामुळे उरण तालुक्यातील पिरकोन, सारडे, वशेणी, पनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कडपे या गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे या गावांमध्ये वास्तव्यास करणाऱ्या सुमारे २५ हजार नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. या आठ गावांसाठी ११ कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र निधीअभावी या प्रकल्पाची रखडपट्टी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
उरण पूर्व विभागातील पिरकोन, सारडे, वशेणी, पनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कडपे आदी गावांना पनाडे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या या धरणाच्या जुन्या, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या सातत्याने फुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी गळती लागलेल्या पनाडे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांसाठी होत असलेला पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी या भागांमध्ये पाणीटंचाईचे उग्र रूप धारण केल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने २०२२ साली ११ कोटींची जलजीवन योजना मंजूर करून घेतली होती. यामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, नवीन पाइपलाइन टाकणे, सौर पॅनेल आदी दुरुस्ती व नवीन कामांचा समावेश होता.

























































