पंढरपूर कॉरिडॉरला व्यापाऱयांचा विरोध; निषेधाचे लावले फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणशी व उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या विकास योजनेला व्यापाऱयांनी विरोध दर्शविला असून, व्यापाऱयांनी दुकानांवर निषेधाचे फलक लावले आहेत. मात्र, निषेधाचे फलक पाहून वारकरी व्यापाऱयांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे.

मंदिर परिसरातील 300 घरे आणि 200 दुकाने नव्याने करण्यात येत असल्याने कॉरिडॉरमध्ये पाडली जाणार असल्याचे समजते. प्रशासनाने विकास आराखडा तयार केला आहे. यावर नागरिकांच्या सूचना व हरकतीदेखील मागवण्यात आलेल्या आहेत. मात्र, हा आराखडा नागरिकांना विश्वासात न घेता तयार केलेला आहे. त्यामुळे या विकास आराखडय़ाला पंढरपूर बचाव समितीने विरोध करत आंदोलन, मोर्चे काढले. तर सध्या मंदिर परिसरातील दुकानांवर ‘कॉरिडॉर हटाव’चे फलक लावून व्यापाऱयांकडून विरोध दर्शवला जात असल्याचे चित्र दिसून येते.

वाराणशी व उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. याकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी केंद्रबिंदू मानून 400 फूट रुंदीकरणाचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. तर मंदिर परिसरातील 12 गल्लीबोळांचेही रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, शहरातील 39 रस्ते, तर प्रदक्षिणा मार्गावरील 22 रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील 92 निवासी मालमत्ता, 70 व्यावसायिक आस्थापना, 9 मठ अशा एकूण 171 मालमत्ता बाधित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे याला विरोध होत आहे. व्यापारी व नागरिकांकडून विरोध दर्शविण्यासाठी दुकानदारांनी दुकानांवर काळे फलक लावून निषेध नोंदविला आहे. पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता येणारे भाविक हे फलक पाहून कॉरिडॉरबाबत उलटसुलट चर्चा करत आहेत.

दुकानदारांनी फलकांवर विरोध दर्शविणारा मजकूर लिहिला आहे. यात ‘पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा, विकासापेक्षा परंपरा टिकवा, सोडा कॉरिडॉरचा अट्टाहास व घेऊ नका आमच्या तोंडाचा घास, श्री क्षेत्र पंढरपूरचा अध्यात्मिक वारसा नष्ट करू नका’, आदी फलक लक्ष वेधून घेत आहेत. तर, फलक लावणाऱया व्यापाऱयांना भाविकांचे टोमणेदेखील ऐकावे लागत आहेत.