
सामना ऑनलाईन। पणजी/बंगळुरू
गोवा आणि कर्नाटकात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. गोव्यात जमलं असले तरी कर्नाटकात मात्र सत्तेचे गणित थांबले आहे. गोव्यात चौघांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन तीन बंडखोर आमदारांची वर्णी भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली, तर तिकडे कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचे आव्हान देताच, भाजपचे येडियुरप्पा यांनीही सोमवारी ठराव होऊनच जाऊ दे, असे प्रतिआव्हान दिले आहे. एवढेच नव्हे, तर आणखी पाच बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
-गोव्यात काँग्रेसला जोरदार धक्का देत दहा आमदारांना भाजप प्रवेश दिल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या तीन आणि एक अपक्ष अशा चारजणांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यांच्या जागी काँग्रेसचे बंडखोर आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर, जेनिफर मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज यांची वर्णी लावण्यात आली. उपसभापती असलेल्या मायकल लोबो यांनाही राजभवनवर पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ आमदार काँग्रेसमधून फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोनतृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे कवळेकर त्याची बक्षिसी म्हणून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून हटवल्यामुळे एक उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते.
काँग्रेसच्या दहा आमदारांच्या भाजपमधील प्रवेशनाटय़ामागे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची भूमिका महत्त्वाची होती. सुरुवातीला बाबूश यांचे नाव मंत्री म्हणून समोर आले होते. मात्र मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी असावी यासाठी शेवटच्या क्षणी बाबूश मोन्सेरात यांची पत्नी जेनिफर यांचा शनिवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
मंत्रिमंडळातून यांना वगळले
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर आणि अपक्ष आमदार तथा महसूल मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिफारस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यपालांकडे केली होती. ही शिफारस स्वीकारण्यात आल्याची अधिसूचना आज गोवा प्रशासकीय कामकाज विभागाचे संयुक्त सचिव गौरीश कुर्टीकर यांनी जारी केली.
भाजपमुळे पर्रीकर यांचा राजकीय मृत्यू
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने पर्रीकर यांची तत्त्वे पायदळी तुडविली आहेत. पर्रीकर यांचा शारीरिकदृष्टय़ा मृत्यू पूर्वी झाला होता परंतु त्यांचा राजकीय मृत्यू आता झाला आहे आणि तो त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज भाजपवर केली. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ आयोजित निषेध सभेत बोलताना सरदेसाई यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
























































