कोविड सेंटरमधील रुग्णांना दररोज बदाम व अंडी, मुख्यमंत्र्यांबद्दल कोविडग्रस्त रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

राज्यातील कोरोनाविरोधातील लढाईत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांनी आपले सर्वस्व पणाला लावले असताना रुग्णांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा पातळीवरील सर्व सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. परभणी जिह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना त्यांची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी दररोज बदाम, दूध व गावरान अंडी खायला दिली जात आहेत. राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱया उपाययोजनांबद्दल कोरोनाग्रस्त रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली.

ऑक्सिजन प्रकल्प येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होणार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या अनुषंगाने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळी थर्मल येथील ऑक्सिजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले. त्यानुसार परळी थर्मल येथील ऑक्सिजन प्रकल्प परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होणार असून मागणी त्वरित मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या