
सामना प्रतिनिधी । परभणी
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला असून आज तापमानाचा पारा चक्क 4 अंशापर्यंत घसरला. याचा परिणाम पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर झाल्याने आज पहाटे रस्त्यावर किरकोळ गर्दी दिसून आली. एकूणच हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर हिंदुस्थानकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम आणखी चार दिवस हा कडाका असाच राहणार आहे. मागील काही वर्षांची तुलना करता, यावर्षी जिल्ह्यात थंडी बरेच दिवस रमणार असल्याचे दिसत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीची लाट आली होती. त्यानंतर तापमानात काहीशी वाढ झाली. परंतु चार दिवसांपासून मात्र पुन्हा थंडीची लाट जिल्ह्यात पसरली आहे.
उत्तर हिंदुस्थानातून थंडगार वारे विदर्भ मार्गे येत आहेत. परभणी आणि हिंगोली हे दोन्ही जिल्हे विदर्भाच्या सीमेवर असल्याने अधिक परिणाम या जिल्ह्यात जाणवत आहे. मंगळवारी पारा 7 अंशावर घसरल्यानंतर रात्री गारठा चांगलाच जाणवला. आज पहाटे परभणी शहरासह जिल्ह्यात पून्हा थंडगार वारे सुरु झाले आहेत. त्यामुळे पारा 4 अंशावर घसरला आहे. अख्खा जिल्हा गारठून गेला आहे. हा थंडीचा कडका आणखी चार दिवस कायम राहणार असून त्यानंतर हळुहळू तापमानात वाढ होईल, अशी माहिती ग्रामीण कृषी हवामन सेवा विभागाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी ‘सामना’ शी बोलताना सांगितले.






























































