मधमाशांच्या हल्ल्यात गच्चीवर खेळणाऱ्या 2 मुलींचा मृत्यू, पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना महिंद (ता. पाटण) येथील बौद्धवस्तीत घडली. अनुष्का दिनेश यादव (वय -12) आणि शेजल अशोक यादव (वय – 8) अशी मुलींची नावे आहेत. या घटनेत आणखी पाचजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महिंद येथील बौद्धवस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, शेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघेजण खेळण्यास गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरापाठीमागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारणाऱ्या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्या घराच्या छप्परास असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला. त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला.

मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबियातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले. त्यानंतर तातडीने अनुष्का, शेजल व अन्य जखमींना उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यापैकी अनुष्का आणि शेजलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अनुष्काचे मुळगाव येळगाव (ता.कराड) असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या