बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, पाथर्डी तालुक्यातील घटना

leopard

बिबटय़ाच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील केळवंडी येथे घडली आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात लहान मुलाचा बळी जाण्याची ही दुसरी घटना असून, यामुळे माणिकदौण्डी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सक्षम गणेश आठरे (रा. केळवंडी, ता. पाथर्डी) असे मृत बालकाचे नाव आहे.

गणेश आठरे यांचा आठ वर्षांचा मुलगा सक्षम हा आपल्या घरात झोपला होता, तर त्याचे आजोबा घरासमोरील पडवीत झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास सक्षमला उलटय़ा झाल्याने तो घराच्या बाहेर आला. त्यानंतर तो आजोबांशेजारी झोपला.

पहाटे साडेतीनच्या सुमारास आठरे यांच्या तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने पडवीत येत सक्षमला उचलून नेले. सक्षमचा आरडाओरडा ऐकून त्याचे आजोबा व शेजारील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत बिबटय़ाने सक्षमला तुरीच्या शेतात नेले होते. ग्रामस्थांनी दगडफेक करत बिबटय़ाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही.

यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनसंरक्षण अधिकारी निरभवणे घटनास्थळी आले. त्यांनी फटाके फोडल्यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास बिबटय़ाने तुरीच्या शेतातून पळ काढला. यानंतर ग्रामस्थ शेतात गेले असता सक्षमचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, याच महिन्यात तालुक्यातील मढी येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात श्रेया साळवे या पाच वर्षीय मुलीचा बळी गेला होता, तर चार दिवसांपूर्वी माणिकदौण्डी येथील नबाजी ढाकणे यांच्या एका शेळीचा बिबटय़ाने फडशा पाडला होता. या परिसरात असलेल्या डोंगरात मोठय़ा प्रमाणात बिबटय़ांचा वावर असून, वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या