मोहटा देवी गडाच्या पायथ्याशी मोहटे कलाकारांनी सादर केली कला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्र उत्सवाचा एक भाग असलेल्या तालुक्यातील मोहटा देवीगडावर गुरुवारी रात्री मोहटा देवीच्या सिंहारुढ मूर्तीची मोठ्या उत्सहात मिरवणूक काढण्यात आली तर आज सकाळी देवीगडाच्या पायथ्याला राज्यातील कलाकारांच्या हजेऱ्याचा कार्यक्रम पार पडला. देवीच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते तर कलाकाराच्या हजेऱ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावत देवीच्या चरणी आपली कला सादर केली.

ग्वाल्हेर येथील शिंदे राजघराण्याने नवसपूर्ती झाली म्हणून फार पूर्वी मोहटा देवीची सिंहासनावर असलेली मूर्ती देवस्थानला भेट दिली होती. या मूर्तीची मोहटे गावातून मोहटे गडावर सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा सुरु झाली. गुरुवारी रात्री आठ वाजता मोहटे गावातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. देवीच्या मूर्तीचे या वेळी देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हान्यायाधीश सुनील गोसावी,विश्वस्त अश्विनी बिराजदार,अशोक विक्रम दहिफळे यांनी पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये संबळासह पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार तसेच महिला मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या.

सहभागी महिलांनी मिरवणूक मार्ग आपल्या साडीच्या पदराने स्वच्छ केला तर ही मिरवणूक मध्यरात्री दोन वाजता मुख्यगडावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आज सकाळी कलाकारांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात तमाशा कलावंत नितीन बनसोडे,मंगला बनसोडे,शंकरपूरकर जाधव,संभाजी जाधव,शांताबाई जाधव यांच्या सह कोल्हाटी,डोंबारी,गारुडी,तिरमली,सोंगाड्या यांनी आपली कला सादर केली. हजेर्यांचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कलाकारांना देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,विश्वस्त भीमराव पालवे,अशोक विक्रम दहिफळे,अशोक भगवान दहिफळे,आजिनाथ आव्हाड,संदीप घुले यांनी बिदागी दिली.