
पाय घसरून तलावात पडल्याने पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात घडली आहे. संदीप दत्तात्रय अकोलकर (वय 28) व बाप्पू दत्तात्रय अकोलकर (वय 22, दोघे रा. करंजी, ता. पाथर्डी) अशी मृतांची नावे आहेत.
संदीप आणि बापू हे दोघे मेंढय़ा घेऊन मुखेकर वस्तीजवळ असलेल्या बोरूडेच्या पाझर तलावाजवळ गेले होते. मेंढय़ा चरून झाल्यानंतर त्यांनी या मेंढय़ा पाणी पिण्यासाठी पाझर तलावाजवळ आणल्या. पाणी पिल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे मेंढय़ा धुण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संदीपचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बापू गेला असता तोही पाण्यात बुडाला. काही वेळाने मेंढय़ा घरी परतल्या. मात्र, दोघे भाऊ परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. काही तरुणांनी तलावात उडय़ा मारून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



























































