
सामना प्रतिनिधी, सेलू
डॉक्टरांचा हे सोनोग्राफीच्या अहवालावरून उपचार करीत आसतात. परंतु सोनोग्राफीचा रिपोर्ट चुकीचा दिला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, असा प्रकार सेलू शहरात घडला आहे. रुग्णाला किडनीस्टोन नसतानाही डॉक्टर मालपाणी यांनी निष्काळजीपणे तपासणी करून दोन किडनीस्टोन असल्याचा रिपोर्ट दिला. परंतु सदरील रुग्णाला अपेंडिक्सचा त्रास वाढल्याने ऑपरेशन करावे लागले. यामुळे चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणाऱ्या डॉक्टर मालपाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मेडिकल काँन्सिलच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करावी याबाबत तक्रार पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोंदवली आहे हा प्रकार वैद्यकीय क्षेत्राला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सोनोग्राफी अहवालावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न रुग्णांच्या मनात येत असून रुग्णांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता पसरली आहे.
पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना रेवनआप्पा साळेगावकर त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद केले आहे की, माझा मुलगा अथर्व साळेगावकर याला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे २४ मे रोजी डॉ. बुरेवार यांच्याकडे तपासणी केली असता, त्यांनी सोनोग्राफीसाठी डॉ. मनोज मालपाणी यांच्याकडे पाठवले. डॉ. मालपाणी यांनी सोनोग्राफी करून २ किडनीस्टोन असल्याचा अहवाल दिला होता. त्यामध्ये एक ११एम.एम. व दुसरा ७ एम.एम. असे किडनीस्टोनचे आकार असल्याचे नमूद केले आहे. या अहवालावरून डॉ. बुरेवार यांनी प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सांगितले. परंतु त्या रात्री अथर्वचा त्रास कमी न होता वाढला.
त्यामुळे त्याला डॉ. खुरुसणे यांच्याकडे दाखवले असता, डॉ. खुरूसणे यांनी परभणी येथे मनियार सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे अथर्वची २५ मे रोजी परभणी येथे मनियार सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी डॉ.अश्विन मंत्री यांनी २ वेळा सोनोग्राफी केली. त्यामध्ये किडनीस्टोन आढळे नाहीत. परंतु अपेंडिक्स आढळून आले. त्यांच्या अहवालावरून यमुना हॉस्पिटल परभणी डॉ.के.एस. माघाडे यांच्याकडे अथर्वचे २६ मे रोजी ऑपरेशन करावे लागले. अथर्व तब्येत ठीक होणे महत्वाचे असल्यामुळे तक्रार देण्यास प्राधान्य दिले नाही. अथर्वची प्रकृती ठीक झाल्यानंतर ११ जून रोजी पून्हा एकदा अथर्वची वरद सोनोग्राफी सेंटर सेलू येथे डॉ. डख यांच्याकडे सोनोग्राफी करून घेतली या सोनोग्राफी मध्ये सुद्धा अथर्वचा रिपोर्ट नॉर्मल आला असून त्याला किडनी स्टोन नसल्याचं अहवालामध्ये नमूद आहे.
या सर्व बाबींवरून डॉ. मनोज मालपाणी यांनी दिलेला २ किडनी स्टोन असल्याचा रिपोर्ट हा चुकीचा आहे. ही बाब निष्पन्न झाली आहे. जर डॉ. मालपाणी यांच्या सोनोग्राफीच्या अहवालावरून अथर्वचे किडनी स्टोनचे ऑपरेशन केले असते तर त्याला नाहक त्रास होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता, त्यामुळे निष्काळजीपणे चुकीचा रिपोर्ट देणारे डॉ.मनोज मालपाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मेडिकल कान्सिलचे नियमानुसारप्रमाणे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी रेवनआप्पा साळेगावकर यांनी पोलीस निरीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.
रुग्णांमध्ये अस्वस्थता पसरली आहे
आपला आजार बरा व्हावा यासाठी रुग्ण हजारो रूपये फी व औषधीचा खर्च करतात. परंतु सोनोग्राफीचा आहवाल चुकीचा ठरत असेल तर हा प्रकार रुग्णांच्या जिवाशी खेळणारा आहे. त्यामुळे सोनोग्राफीसाठी हवाला देणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चुकीच्या सोनोग्राफीची माहीती कळताच उपचार घेतलेल्या अनेक रुग्णामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
न्यायालयात खटला चलविणार
ज्यांच्या नशिबी हा प्रसंग येतो, त्यालाच त्याचे गांभीर्य समजते. हा प्रकार माफी करण्यासारखा मुळीच नाही. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर दवाखान्याची तोडमोड केली आसती. परंतु आपण कायदेशीर मार्गाने कार्यवाही व्हावी याकरीता रीतसर तक्रार नोंदवली आहे. जर यामध्ये पोलीस निरीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून विहित मुदतीत योग्य कार्यवाही झाली नाही तर संबधितांसह पोलीस निरीक्षक व जिल्हाशल्यचिकित्सक यांना प्रतिवादी करून आपण न्यायालयात खटला चालवणार, अशी प्रतिक्रिया अथर्वचे वडील रेवणअप्पा साळेगांवकर यांनी दिली.
प्रतिक्रिया
कोणताही पेशंट हा आमच्यासाठी देवच असतो. त्यामुळे चुकीचे निदान करण्याचा प्रश्नच नाही. त्या रुग्णाच्या मुत्रपिंडावर देखील सूज होती. त्यामुळे सदरील रुग्णाने इतरही काही तपासण्या करणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही चुकीचे निदान केले, असे होत नाही, असे मत डॉ. मनोज मालपाणी यांनी व्यक्त केले.






























































