‘पवित्र’वरील शिक्षक भरती रखडली, प्रक्रियेविरोधातील विविध याचिकांमुळे ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पवित्र’ पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱया ऑनलाइन शिक्षक भरतीविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून पवित्र पोर्टलवर भरतीबाबत एकही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

राज्यात पारदर्शकपणे शिक्षक भरती पार पाडण्यासाठी पवित्र पोर्टलवरून ऑनलाइन शिक्षक भरती करण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार होती. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेतील प्रमुख टप्पे पूर्ण करून पैसे खर्च न करता शिक्षकपदी नेमणूकही मिळविली आहे. यातील काही उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नेमणूक न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. याचिकेत समांतर आरक्षण, ब्रीज कोर्स आणि टीईटीची अट याविषयी काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. या याचिकांवर न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय न दिल्याने भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा पूर्ण करणे शक्य नाही.

द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी
पुढील टप्प्यात खासगी शिक्षण संस्थांमध्ये तीन हजार पदे भरण्यात येणार आहेत. यात द्वितीय श्रेणीत गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून येत्या काही दिवसांत त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीचे आमंत्रण मिळणार असून ही प्रक्रिया पार पडण्यास एप्रिल महिना उजाडणार आहे.