
सामना प्रतिनिधी। पेण
शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पेण येथे ” समृद्ध रायगड कृषी महोत्सवाचे ” आयोजन रायगड जिल्हा परिषदे मार्फत 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पेण येथे मुंबई – गोवा महामार्गावर हॉटेल मंथन शेजारी असलेल्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रानमेवा, मत्सपालन व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय ,गाई म्हशी, शेळ्या व मेंढी पालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आगरी , कोळी समाजाच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद खवय्यांना या ठिकाणी घेता येईल. नाशिक ढोल, ब्रास ब्रॅण्ड व कबड्डी स्पर्धा, पारंपरिक आदिवासी व कोळी नृत्य यावेळी सादर करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी महोत्सवाची वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. या वेबसाइटवर शेती उत्पादने, रानमेवा उत्पादने, विविध जातींची धान्य विषयक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थींना सहलीच्या माध्यमातून प्रशिक्षण व शेती अवजारे याची माहिती देण्यात येणार आहे. ईज्राईल पॅटर्न शेती व विविध प्रकारच्या कलमांची माहिती व प्रदर्शन या वेळी देण्यात येईल. अत्याधुनिक शेती व शेती विषयक जोडधंद्यांची माहिती व प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे तरी जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त शेतकरीवर्गाने या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी केले.
































































