
सामना प्रतिनिधी । नगर
जिल्ह्यातील ईपीएस ९५ चे अल्प पेन्शनधारक त्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर रविवार धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदन गांधी यांना देऊन लोकसभेच्या अधिवेशनात बाजू मांडण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे समन्वयक व महाराष्ट्र पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर यांनी दिली आहे.
ईपीएस पेन्शनधारकांना दरमहा ७५०० रु. व त्यावर निगडीत महागाईभत्ता एवढी कमीतकमी पेन्शन मिळावी. अंतिम निर्णय होईपर्यंत हंगामी स्वरुपात कमीत कमी ५००० रु. व महागाई भत्ता एवढी पेन्शन त्वरित लागू करावी. प्रोव्हिडंट फंड कार्यालयाचे दिनांक ३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी, हायर पेन्शन या सूत्राची अंमलबजावणी करावी. सर्व पेन्शनरांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी. सर्व पात्र पेन्शनरांना दोन वर्षे वॅटचा त्वरित लाभ घ्यावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये खासदारांनी पेन्शनर्सची बाजू संसदेत मांडावी यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील वीज मंडळ, एस. टी. महामंडळ, साखर उद्योग, विडी उद्योग, सहकारी बँका, सर्व सहकारी संस्था, शेती महामंडळ, फेडरेशन, विविध औद्योगिक संस्था, कारखाने, ट्रस्ट, हॉस्पिटल आदी क्षेत्रातील सेवानिवृत्त पेन्शन धारक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

























































