कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणारा पिकअप नगरमध्ये पेटविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शेंडी बायपास (ता. नगर) येथे पकडला. दरम्यान, गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱया दोघांना गोवंश रक्षकदलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. जनावरांची सुटका करत पिकअप पेटवून देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱया जावेद मुसा पठाण (वय 28) व अजमद मस्तान शहा (दोघे रा. ममदापूर, ता. राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद पठाण व अजमद शहा यांनी गोवंशीय जनावरे पिकअपमध्ये भरून कत्तलीसाठी विक्री करण्यास नगर येथे घेऊन येत होते. याची माहिती गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी शेंडी बायपास येथून पिकअपचा पाठलाग सुरू केला असता, शेंडी बायपासजवळ पिकअप उलटली. यात पिकअपमधील 18 वासरे, दोन गाई मृत्युमुखी पडल्या, तर तीन गाई जखमी झाल्या. दरम्यान, संतप्त झालेल्या गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पिकअपमधून गोवंशीय जनावरे बाहेर काढली. पठाण व शहा यांना मारहाण करत त्यांचा पिकअप पेटवून दिला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पिकअप व जनावरे ताब्यात घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पठाण व शहा यांना मारहाण केल्याप्रकरणी पठाण याच्या फिर्यादीवरून चांगदेव भगत, सिद्धार्थ कराळे, भूषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू ऊर्फ संदीप भगत, ज्ञानू दाणी, अतुल कराळे, योगेश संतोष शिंदे, विकास चव्हाण व इतर चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.