
सामना ऑनलाईन । लाहोर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे. इम्रान यांची एक मुलगी असून त्यांनी उमेदवारी अर्जात मात्र त्यांना मूल नसल्याचे म्हटले आहे. अर्जात चुकीची माहिती देऊन त्यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे असे सांगत लाहोर उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत इम्रान खान हे पंतप्रधानपदासाठी अपात्र असल्याचे म्हटले असून त्यांच्याविरोधातील ही याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. या याचिकेवर सोमवार पासून सुनावणी होणार आहे.
या याचिकेत अॅना लुईसा व्हाईट आणि लॉर्ड गॉर्डन व्हाईट यांची मुलगी टायरिन जेड खान व्हाईट ही इम्रान खान यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. इम्रान खान यांनी याबाबत माहिती त्यांच्या उमेदवारी अर्जात दिलेली नाही. त्यांनी पाकिस्तान संविधान कायदा 62 व 63 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ते पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र आहेत, असे म्हटले आहे.
























































