
देशातील आठ कोटी कर्मचाऱ्यांना आता यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार आहे. ‘ईपीएफओ 3.0’ या नव्या सुधारित प्रणालींतर्गत आता पीएफधारकांना त्यांच्या खात्यातील पात्र रक्कम थेट यूपीआयद्वारे काढता येणार आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय यांनी नुकतीच या सुविधेच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली असून ही सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास मॅन्युअल पडताळणी करावी लागते.
कागदपत्रांमध्ये किरकोळ चूक आढळल्यास क्लेम नाकारला जातो किंवा रखडतो. मात्र ‘ईपीएफओ 3.0’ मुळे ही संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित होणार आहे. यात कंपनी मालकाच्या मंजुरीची गरज नसल्यामुळे आठवड्यांचे काम अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होणार आहे.
50 ते 75 टक्के रक्कम काढता येणार; नवा नियम आणि मर्यादा काय आहेत?
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी पीएफ खात्यातील सर्व रक्कम काढता येणार नाही. पीएफ खात्यात सदस्यांना यांच्या एकूण रकमेच्या 50 ते 75 टक्क्यांपर्यंतचीच रक्कम यूपीआयद्वारे काढता येईल. 25 टक्के रक्कम नेहमी लॉक राहील. ‘उमंग’ अॅपवर सदस्यांना ‘पात्र ’ आणि ‘लॉक केलेली शिल्लक’ स्वतंत्रपणे पाहता येईल. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी लागणारा निधी या सुविधेमुळे अवघ्या तीन दिवसांच्या आत किंवा अगदी तत्काळ बँक खात्यात जमा करता येईल.

























































