फलटणमध्ये दाम्पत्याला 10 लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फलटण तालुक्यातील शिंदेनगर येथील दाम्पत्याची ऊसतोडणी कामगार देतो म्हणून 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदार भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी कुशा गर्जा पटले, बुशा गर्जा पटले (रा. आगरीपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बापूराव जगन्नाथ रणवरे (वय 47, रा. शिंदेनगर, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादी बापूराव रणवरे यांच्याकडून 2022-23च्या हंगामासाठी ऊसतोडणी कामगार देतो म्हणून कुशा पटले याने पाच लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून घेतले होते. तसेच बापूराव यांच्या पत्नी चित्रा रणवरे यांच्याकडून बुशा पटले यानेही पाच लाख रुपये घेतले होते. मात्र, या दोघांनीही कामगार न पाठविता पैसेही परत दिले नाहीत. रणवरे दाम्पत्याने पैसे परत मागितले असता, दमदाटी केली. त्यामुळे रणवरे दाम्पत्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.