
कंपनीच्या आवारातून पिकअप वाहनाची चोरी करणाऱ्याला वारजे माळवाडी पोलिसांनी 48 तासांच्या आतमध्ये अटक केली. त्याच्याकडून वाहन जप्त करण्यात आले आहे. ही चोरी शिवणेतील कामठे इंडिस्ट्रिअल इस्टेट परिसरात घडली होती. व्हिक्टर फिलीप जॉन डॅनियल (36, रा. रामनगर वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शिवणेत कंपनीच्या आवारात रस्त्यावर उभा केलेले मालवाहू पिकअप चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी वारजे पोलीस तपास करीत असताना पोलीस अंमलदार गौरी राजगुरू, पोलीस शिपाई नंदकिशोर चव्हाण, अमोल सुतकर यांना वाहन चोर दांगट पाटील इस्टेट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी सापळा रचून व्हिक्टरला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने वाहन चोरीची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलंडे, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गौरी राजगुरू व वाहन चोरी पथकातील पोलीस शिपाई नंदकिशोर चव्हाण, अमोल सुतकर, विजय भुरुक, अजय कामठे, शशी गोहिणे, विजय खिलारी यांनी केली आहे.

























































