दहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन

सामना ऑनलाईन । बिश्केक

शांघाय सहकार्य शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख न करता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर हल्ला चढवला आहे. या संमेलनात मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट घेतली नाही किंवा हस्तांदोलनही केले नाही. त्यानंतर त्यांनी सदस्य राष्ट्रांना दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. दहशतवादाला समर्थन, सहकार्य, प्रोत्साहन, आश्रय आणि आर्थिक मदत देणाऱ्या राष्ट्रांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानकडून दहशतवादाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीबाबत त्यांनी सदस्य राष्ट्रांचे लक्ष वेधले. दहशतवादमुक्त समाजासाठी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असून दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. दहशतवादाला मिळणारी आर्थिक मदत रोखण्यापासून ते दहशतवादाचा समूळ नायनाट होईपर्यंत एकत्र असणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र आल्यास दहशतवादाचे समूळ उच्चाटन होऊन समाजात शांतता प्रस्थापित होईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. फक्त हिंदुस्थानलाच नाही तर संपूर्ण जगाला आणि जागतिक शांततेला दहशतवादापासून धोका असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

लवकरच रशियन भाषेत पर्यटनाबाबतची हेल्पलाईन सुरू होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच सर्व एससीओ देशांसाठी ई व्हिसाची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील शांतता प्रकियेला हिंदुस्थानचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. एससीओ देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य, आर्थिक, उर्जा, अपारंपरिक उर्जा या क्षेत्रात सहकार्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हिंदुस्थानातील 10 सर्वश्रेष्ठ साहित्य रचनांचा एससीओ देशातील भाषांमध्ये अनुवाद होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्कृती आणि साहित्यामुळे समाजात एकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे कट्टरतावादाला आळा घालणे शक्य होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या आधुनिक जगात संपर्क वाढवण्यावर मोदी यांनी भर दिला. देशातील संबंध, सहकार्य आणि मैत्री वाढवण्यासह देशातील नागरिकांचाही परस्परांशी संपर्क वाढला पाहिजे असे ते म्हणाले.