
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी देशातील जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचना नमो ऍपच्या माध्यमातून पाठवाव्यात, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱया पर्वातील पहिला स्वातंत्र्य दिन विशेष बनवण्यासाठी मोदींनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचनांचा ते आपल्या भाषणात समावेश करणार आहेत. तुमच्या सूचनांचा मी माझ्या भाषणात अंतर्भाव करण्यासाठी आतुर झालो आहे. तुमचा विचार मी माझ्या भाषणातून 130 कोटी देशवासीयांपुढे मांडणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहचवण्यासाठी नमो ऍपवर ओपन फोरम तयार करण्यात आला असून तेथे प्रत्येक जण आपली सूचना नोंदवू शकणार आहे.
























































