पीएमपीएल बसप्रवास ठरतेय लुटीचे केंद्र, महिलांच्या दागिने चोरीचे सत्र कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसप्रवास महिलांसाठी लुटीचे केंद्र बनत असल्याचे दिसून आले आहे. बहुतांश बसस्थानकासह गर्दीच्या ठिकाणांवर चोरट्यांकडून प्रवाशी महिलांसह ज्येष्ठांना लक्ष्य केले जात आहेत. त्यामुळे हद्दीतील बीट मार्शल, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणांवरील पोलिसांची गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

पीएमपीएल स्थानकात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी प्रवाशी महिलांच्या दागिन्यांची चोरी करून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. आठवड्याभरात चार ते पाच घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या होणार्‍या चोर्‍यांमुळे एसटी स्थानकासह पीएमपीएल बसप्रवासात सराईतांचे फावले आहे. शहरातंर्गत प्रवासासाठी कामगारांसह विविध महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिंनी, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांकडून पीएमपीएल बसला प्राधान्य दिले जाते. मात्र, स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकासह पुणे स्टेशन, हडपसर, कोंढवा शिवाजीनगरसह बहुतांश पीएमपीएल स्थानकांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हडपसर बसस्थानक केले जातेय लक्ष्य

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेकडील पर्समधील 70 हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना 9 डिसेंबरला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हडपसर गाडीतळ बसस्थानकात घडली. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, 7 डिसेंबरला संध्याकाळी चारच्या सुमारास सातववाडी बसस्थानकात महिलेकडील 35 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली. याप्रकरणी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी महिला 7 डिसेंबरला पीएमपीएल बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून अडीच हजारांची रोकड, 34 हजारांचा सोन्याचा नेकलेस असा 36 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.