
प्रेमासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. मात्र पाकव्याप्त काश्मीरमधील एका 22 वर्षीय तरुणाने थेट नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. भारतीय लष्कराने त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडे सोपवले आहे.
झीशान अहमद मीर असे या तरुणाचे नाव असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद जिल्ह्यातील पैंकाडी गावचा रहिवासी आहे. शनिवारी रात्री तो उरीमधील सिलिकोट परिसरातून भारतीय हद्दीत प्रवेश करत असताना जवानांच्या निदर्शनास आला. त्यानंतर जवानांनी त्याला अडवून ताब्यात घेतले.
झीशान ज्या तरुणीला भेटण्यासाठी आला होता, त्या इरम बानो हिलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इरम ही नियंत्रण रेषेजवळील तिलावरी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये झीशान आणि इरम स्वतःची ओळख सांगताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. दोघेही एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याचे व्हिडीओत दिसते.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, झीशान आणि इरम यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. विशेष म्हणजे दोघेली नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. झीशानचे कुटुंब मूळचे उरी परिसरातील असले तरी अनेक वर्षांपूर्वी ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थायिक झाले होते.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी संयम राखत कारवाई केली आणि कोणताही अनुचित प्रकार न घडू देता तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
























































