
वरळीतील डॉग शॅम्पू आणि कॉस्मेटिक कंपनीत हातसाफ करून पसार झालेला आणि पोलिसांना चकवा देत लपून राहणारा सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये सापडला. त्या आरोपीविरोधात शहरातील 17 पोलीस ठाण्यांत 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
वरळी येथे ईएम ऍण्ड ईएम पर्सनल केयर प्रा. लि. ही कंपनी असून 8 फेब्रुवारी रोजी कंपनीतील 60 हजार रुपये चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लीलाधर पाटील, अंमलदार सुनील जगताप, संदीप बुगडे, अलंकार जाधव, किरण परब आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पथकाने कंपनीतील सीसीटीव्ही तपासले, पण त्यावरून आरोपीचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी खास खबर्यांना कामाला लावल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी सराईत गुन्हेगार सलीम शेख असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महिनाभर शोध घेऊनही सलीम हाती लागत नव्हता. अखेर शनिवारी शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरू असताना लीलाधर पाटील व पथकाला माहिती मिळाली की सलीम पोद्दार रुग्णालयामागील गल्लीत फिरत आहे. मग पोलिसांनी तेथे जाऊन सलीम शेख (55) याच्या मुसक्या आवळल्या. सलीमविरोधात पायधुणी, पार्कसाइट, अंबोली, आग्रीपाडा, मालाड, एमआयडीसी, जोगेश्वरी, गोरेगाव, ताडदेव, अंधेरी आदी पोलीस ठाण्यांत 30 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
























































