रस्ते अपघात प्रकरणी पोलिसांनी म्हशीला केली अटक !

चोर, गुंड, दरोडेखोर यांना पोलिसांनी अटक केलेले आपण ऐकतो. वर्तमानपत्रात याबाबत छापून आलेल्या बातम्या वाचतो. पण वाचून आश्चर्य वाटेल की, एका गुन्ह्याबाबत पोलिसांनी चक्क म्हशीला अटक केली आहे.

अलीगढमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. येथे रस्ते अपघातात पोलिसांनी एका म्हशीला अटक केली आहे. म्हशीकडून कसा अपघात होऊ शकतो, हे वाचून तुम्ही थक्क व्हाल,पण अशी घटना घडली आहे.

या म्हशीचा मालक तिला रस्त्यावरून घेऊन जात होता. तेव्हा मागून येणाऱ्या एका गाडीने हॉर्न वाजवला. त्यामुळे म्हैस घाबरली. घाबरून या म्हशीने पुलाखाली उडी मारली. पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षावर ही म्हैस पडली. त्यामुळे रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आणि रिक्षात बसलेली चार माणसे गंभीररीत्या जखमी झाली.

या घटनेमुळे गावकऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, म्हशीचा मालक तिला सोडून पळून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी म्हशीला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेऊन बांधून ठेवले.

या अपघातात जखमी झालेल्या चार व्यक्तिंना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र या प्रसंगाबाबत आता कोणती कारवाई करावी, असा मोठा पेच पोलिसांना पडला आहे. शिवाय या म्हशीचा मालकही अजूनही तिला न्यायला आलेला नाही. त्यामुळे म्हशीच्या मालकाचा शोध लागल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या