मंत्री बदलले अधिकाऱ्यांना माहितीच नाही, भाजप प्रदेशाध्यक्षांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत केली मोठी चूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uttarakhand

उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांना सोमवारी राज्य पोलिसांनी बागेश्वर येथे प्रोटोकॉलचं उल्लंघन करत ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. आधीच मुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे चर्चेत असलेलं उत्तराखंड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही चूक झाल्याचं स्वीकारत गैरसमजातून ही घटना घडल्याची कबुली दिली आहे. बागेश्वर पोहोचल्यावर उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मदन कौशिक माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या मंत्रिमंडळात सदस्य होते आणि त्यांची नुकतीच प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक (कायदे-व्यवस्था) नीलेश आनंद भार्ने यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना गार्ड ऑफ ऑनर देण्याची चूक झाल्याची कबुली दिली आहे. तसेच गैरसमजातून हे घडल्याचे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, यासाठी जबाबदार असलेले अधिकारी नुकतेच सुट्टीवरून परतले आहेत आणि त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या बदलाची माहिती नव्हती. त्यामुळेच मदन कौशिक हे मंत्री असल्याचे समजून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या महिन्या सुरुवातीलाच राजीनामा दिला होता. त्यानंतर तीरथ सिंह रावत यांनी 10 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. कौशिक, जे राज्य विधानसभेत हरिद्वारचे प्रतिनिधित्व करतात त्यांना 12 मार्च रोजी बंसीधर भगत यांच्याजागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते जे आता मंत्री आहेत.

तीरथ सिंह रावत उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा क्षेत्रातील खासदार आहेत. ते उत्तराखंडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देखील राहिले होते. आता भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड मध्ये राजकारण वेगाने वेगवेगळी वळणं घेत आहे. आमदारांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांना संधी मिळाली.