
आरे कॉलनीमध्ये पुरातन श्रीराम मंदिराच्या बाजूला ख्रिश्चन दफनभूमी बांधण्याचे प्रस्तावित असून मंदिराच्या बाजूला ही दफनभूमी बांधू नये, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करून जोरदार विरोध करण्यात आला. या मोर्चात विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी बांधण्यात येत असलेल्या भिंतीचे बांधकाम रोखण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱया कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायद्यासाठी आंदोलन करणाऱया सकल हिंदू समाजाच्यावतीने आज आरे कॉलनी येथे प्रस्तावित असलेल्या दफनभूमीविरोधात आंदोलन करण्यात आले. श्री राम मंदिराच्या बाजूला ख्रिश्चन दफनभूमी प्रस्तावित असून सध्या दफनभूमीच्या भिंतीचे काम सुरू आहे, मात्र या दफनभूमीला सकल हिंदू समाज या संघटनेचा विरोध आहे. या विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
हिंदू संघटनांचा विरोध का आहे?
आरे कॉलनीत सध्या हिंदू, मुस्लिम आणि बोहरा समाजाची स्मशानभूमी असून ख्रिस्ती समाजासाठी एक स्मशानभूमी प्रस्तावित असून ती मुंबई महापालिकेच्या इमारत देखभाल विभागाकडून बांधण्यात येणार आहे. मात्र, ही स्मशानभूमी पुरातम श्रीराम मंदिराच्या बाजूला बांधण्यात असल्यामुळे विविध हिंदू संघटना, समित्या, भाविक आणि रहिवाशांचाही याला विरोध आहे.
मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच हिंदूंच्या विविध संघटना आणि संस्थांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरेमध्ये प्रस्तावित दफनभूमीच्या ठिकाणी जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. परवानगी नसताना मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.






























































