
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने मुंबई क्राइम ब्रँचसह साऱया पोलीस दलाची अब्रू चव्हाटय़ावर आणल्यानंतर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याची गंभीर दखल घेतली असून डिटेक्शन क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी असलेल्या बहुसंख्य पोलीस अधिकाऱयांना क्राइम ब्रँचबाहेर हलविले आहे. त्यामुळे सारी क्राइम ब्रँच हादरून गेली आहे. एका वाझेने केलेल्या घृणास्पद कृत्याची शिक्षा आम्हाला का, असा सवाल हे अधिकारी करीत आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकासह मुंबई क्राइम ब्रँचमध्ये 15-16 शाखा आहेत. त्यात ‘सीआय’ युनिटही येते. या शाखेच्या प्रमुखपदी असलेल्या सचिन वाझेने दुष्कृत्य केले. मुंबई क्राइम बँचची अब्रू धुळीला मिळवली. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली व गुन्हे प्रकटीकरण विभागातील बहुसंख्य शाखाप्रमुखांच्या पोलीस ठाण्यात बदल्या केल्या. त्यातील बऱयाच जणांच्या त्यांच्या घरापासून दूरवर दोन-दोन, तीन-तीन तासांवर असलेल्या पोलीस ठाण्यात बदल्या केल्या आहेत. अलीकडील वाढती गर्दी व कोरोनाचा काळ पाहता घरापासून जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात शक्यतो बदली केली जाते. परंतु क्राइम ब्रँचमध्ये काम करीत असल्यामुळे तसेच सचिन वाझेने पोलिसांची प्रतिमा मलिन केल्यामुळे क्राइम ब्रँचमधील बहुसंख्य अधिकाऱयांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याचा फेरविचार करावा व क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आलेल्या निष्कलंक अधिकाऱयांना निदान घरापासून नजीकच्या पोलीस ठाण्यात तरी बदली द्यावी, अशी मागणी काही अधिकारी करीत आहेत.
पोलीस आयुक्तांनी मंगळवारी 86 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. त्यात बहुसंख्य अधिकारी डिटेक्शन क्राइम ब्रँचमधील हुशार व नॉन कॉन्ट्रीवर्सल अधिकारी आहेत. अशा अधिकाऱयांची मुंबई क्राइम बँचला गरज असताना त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने साऱया मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जनहितार्थ व प्रशासकीय निकडीनुसार बदल्या करण्यात आल्याचे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे. यावर नाराज झालेले अधिकारी म्हणतात, सचिन वाझेच्या कर्माची शिक्षा आम्हाला का? क्राइम ब्रँचमध्ये नियुक्ती होऊन काहींचा सहा महिन्यांचाही काळ लोटलेला नाही. तरीही त्यांची बदली, तीही घरापासून फार दूरवर करण्यात आली आहे. हा ठपका सहन न होण्यासारखा आहे. आता इतर अधिकारी क्राइम ब्रँचमधून हद्दपार केलेल्या अधिकाऱयांकडे संशयाने बघत आहेत. त्यामुळे अनेक पोलिसांचे मनोबल ढासळण्याची शक्यता आहे, असेही एका अधिकाऱयाने दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.






























































