
मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. ‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना पूजाची त्यातील डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे आणखी एक कारण आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला ‘बळी’ 16 एप्रिल 2021 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘बळी’चे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून त्यात स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे. यानिमित्ताने पूजा सावंत आणि स्वप्नील जोशी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. या हॉरर चित्रपटातील भूमिकेबाबत पूजा म्हणाली, मला हॉरर चित्रपटांची खूप भीती वाटायची. असे चित्रपट पाहताना पूर्वी मी दारे आणि खिडक्या उघडय़ा ठेवून पाहायचे.
‘लपाछपी’नंतर आता त्यात थोडासा बदल झाला आहे. आता मला अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचा आत्मविश्वास आला आहे, त्याचबरोबर आता मी हॉरर चित्रपट बिनधास्तपणे पाहतेसुद्धा. ‘लपाछपी’ माझ्या चित्रपट कारकीर्दीतील एक टर्निंग पॉइंट होता.

























































