
सामना प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनची चार वर्षांनंतर होणारी निवड मंगळवारी मुंबईत पार पडली. पूनम महाजन यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी आणि गोविंद मुथूकुमार यांची जनरल सेक्रेटरीपदी वर्णी लागली.
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनशी संलग्न असलेल्या 38पैकी 27 सदस्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिककडून दयानंद कुमार तर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग संचालकाकडून अभय चव्हाण यांनी यामध्ये निरीक्षकाची भूमिका पार पाडली. ऍडव्होकेट श्रीजीत नायर हेही निरीक्षक म्हणून उपस्थित होते. 2019 ते 2023 या चार वर्षांकरिता या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
बीएफआयच्या निर्णयावर नजरा
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या या निवडणुकीवर काहींनी बहिष्कार घातला. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नाही. सर्वसाधारण बैठका नाहीत. पारदर्शकता नाही अशाप्रकारच्या मुद्यांवरून विरोधकांनी यामधून माघार घेतली. ही निवडणूक वैध नसल्याचाही सूर उमटू लागला. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएफआय) चंदर मुखी शर्मा यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनकडून आम्हाला कागदपत्रे सादर केल्यानंतर पडताळणी करून योग्य तो निर्णय घेऊ. त्यामुळे आता बीएफआयच्या निर्णयावर साऱयांच्या नजरा असणार आहेत.

























































