
सुरनकोट भागात 21 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी सैन्याने ताब्यात घेतलेल्या आठ जणांपैकी तिघे मृतावस्थेत आढळल्यानंतर सैन्याने कोर्ट ऑफ इन्क्वायरी बसवले आहे. सुरनकोट बेल्टचे प्रभारी ब्रिगेडियर स्तरावरील अधिकारी आणि 48 राष्ट्रीय रायफल्सच्या तीन सैनिकांनाही त्यांच्या सध्याच्या कर्तव्यावरून हटवले आहे.
लष्करप्रमुख मनोज पांडे यांनीही सोमवारी पुंछला धाव घेऊन या प्रकरणी सैन्याधिकाऱयांशी चर्चा केली. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर अमेरिकन बनावटीच्या एम-4 कार्बाईन असॉल्ट रायफलमधून बेछूट गोळीबार केला होता. सुरनकोट भागातील ढेरा की गली आणि बाफलियाजमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर सैन्याने परिसरात शोधमोहीम राबवत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या 8 संशयितांपैकी सफीर अहमद, मोहम्मद शौकत आणि शब्बीर अहमद हे तिघे 22 डिसेंबर रोजी टोपा पीर येथे मृतावस्थेत सापडल्यावर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
हल्ल्यातील एम-4 कार्बाईन अफगाणिस्तानातून आली
पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाची छायाचित्रेही प्रसृत केली होती. त्यांनी वापरलेली एम-4 रायफल अफगाणिस्तान सोडताना अमेरिकन सैन्याने मागे सोडलेल्या शस्त्रसाठय़ाचा भाग आहे. या रायफली पाकिस्तानातून पुरवण्यात आल्या.
तीन जवानांना अंतिम निरोप
या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या नाईक बिरेंद्र सिंह आणि रायफलमन गौतम कुमार या उत्तराखंडच्या दोन जवानांसह कानपूरच्या करण यादव या जवानाच्या पार्थिवावर आज त्यांच्या गावी पूर्ण लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. गौतम कुमार यांचे येत्या मार्चमध्ये लग्न होणार होते.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राजौरी, पुंछ आणि बाफलियाजमध्ये अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर पुंछ आणि राजौरी जिह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोव्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना नजरपैदेत ठेवण्यात आले.
























































