
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाला असून या रस्त्यावरती खड्डेच खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपासून रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी तारामुंबरी ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतीला निवेदनाव्दारे केली होती. मात्र अद्याप या रस्त्याची डागडुजी न केल्यामुळे तारामुंबरी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना जाब विचारण्यासाठी गुरुवारी नगरपंचायतीध्ये गेले होते. नगराध्यक्षांनी या रस्त्याचे काम निधी उपलब्धतेनुसार करण्यात येईल असे सांगितले.
देवगड तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुलाजवळील रस्ता खडडेमय बनला असून रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाला आहे. या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, असे निवेदन तारामुंबरी ग्रामस्थांच्यावतीने काही महिन्यांपुर्वी दोनवेळा देण्यात आले होते. मात्र अद्यापही या रस्त्याची डागडुजी केली नसल्याने अखेर तारामुंबरी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी नगराध्यक्ष प्रभू यांनी सांगितले की, हा रस्ता नविन करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले असून ते शासन दरबारी पाठवण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार या रस्त्याला मंजूरी मिळताच काम सुरु करण्यात येईल असे सांगितले. तोपर्यंत रस्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर नगराध्यक्षा यांनी सांगितले की, या रस्त्यावरील खड्डे तात्पूरत्या स्वरुपात बुजविण्यात येतील. हाचा रस्ता लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये सध्या दुसऱ्या ठिकाणी मंजूर झालेल्या रस्त्याचा निधी तारामुंबरी रस्त्याकडे वळविण्यात येईल आणि हे काम पुर्णत्वास नेण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी तारामुंबरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
























































