
सामना प्रतिनिधी । परभणी
अनेक वर्ष वारंवार मागणी केल्यानंतर नांदगाव (बु.) ग्रामपंचायत हद्दीतील पंतप्रधान सडक योजनेंतर्गत रस्ता नांदगाव बु. ते साबा दीड कि.मी अंतराचा तयार करण्यात आला. परंतु अवघ्या पंधरा दिवसात हा संपूर्णत: उखडल्याने निकृष्ट प्रतिच्या रस्त्याची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात परभणी तालुक्यातील नांदगाव (बु.) ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यास प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत मान्यता मिळाली. हा रस्ता दोन टप्प्यात करण्यात आला. त्यातील नांदगाव बु. ते साबा हा दीड कि.मी.पर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट आणि कमी साहित्य वापरुन तयार करण्यात आल्याने अवघ्या पंधरा दिवसात हा रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. परिणामी गावातील नागरिकांसह शालेय विद्याथ्र्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन नांदगाव बु.चे सरपंच हनुमान जवंजाळ, चेअरमन सतीश जवंजाळ, मुरलीधर जवंजाळ, ज्ञानोबा जवंजाळ, नारायण जवंजाळ आबाजी जवंजाळ, बालासाहेब जवंजाळ, शिवाजी जवंजाळ व मुंजाजी जवंजाळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

































































