
परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून घरचे ओरडले. शिवाय शिकवणीच्या शिक्षकाने नियमित वेळेपेक्षा एक तास लवकर येण्यास सांगितले म्हणून त्याच्या डोक्यात भलतेच विचार फिरू लागले. आजी सोबत तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला. पण परळ टि टि येथे आजीचा हात शिताफिने झटकून तो पसार झाला. अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या आजीच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाचे आई वडील ते ऐकून हबकलेच. पण भोईवाडा पोलिसांनी अचुक माग काढत त्या मुलाला नालासोपार्याहून आणून पून्हा पालकांच्या स्वाधीन केले.
तन्मय (12, नाव बदलेले) हा इयत्तेत सातवीत शिकतो. त्याला चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले. त्यामुळे पालक त्याच्यावर वैतागले. शिवाय खासगी शिकवणीच्या मास्तरांनी त्याला नियमित वेळेपेक्षा एकतास लवकर शिकवणीला येण्यास सांगितले. यामुळे तन्मयचे डोके सटकले. सोमवारी संध्याकाळी आजी सोबत तन्मय परळ येथील शिकवणीला निघाला. पण परळ टि टि येथे आजीचा हात झटकून तो अचानक बेपत्ता झाला. मुलगा अशाप्रकारे नाहीसा झाल्याने त्याच्या आजीला काय करावे आणि काय नको तेच समजेनासे झाले. त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित कदम व त्यांच्या पथकाने लागलीच तन्मयचा शोध घेण्यास सुरुवात केली. पथकाने घटनास्थळ तसेच परळ, प्रभादेवी व दादर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा तन्मय हा प्रभादेवी स्थानकात विरार लोकलमध्ये बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी मग प्रभादेवी ते विरार दरम्यानच्या सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तन्मय नालासोपारा स्थानकात उतरल्याचे दिसले.
मग पोलिसांनी नालासोपारा स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो तुळींज परिसरातील एका उड्डाणपुलाखाली बसलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन सुखरूप त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. नालासोपारा येथे मावशी राहते. त्यामुळे नालासोपारा येथे मावशीकडे पळून गेलो होतो असे त्याने सांगितले.

























































