
प्रबोधन कुर्ला शाळा आता डिजिटल बनली आहे. शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम, शाळेने मिळविलेले यश तसेच विविध क्षेत्रात चमकत असलेल्या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांची माहिती यासह शाळेच्या ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी शाळेची वेबसाईट तयार करण्यात आली आहे. prabodhankurlaschool.com या वेबसाईटचे नुकतेच उद्घाटन पार पडले.
यावेळी वेबसाईटसोबतच prabodhankurlaschoolmumbai या नावाने शाळेचे यूटय़ूब चॅनेल सुरू करण्यात आले आहे. तसेच ‘प्रबोधन कुर्ला शाळा’ या नावाने बनलेल्या शाळेच्या फेसबुक पेजवर शाळेच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सर्वांना पाहायला उपलब्ध आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांची संकल्पना शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ कोरगावकर व शलाका कोरगावकर यांची आहे.
शाळेचे सहाय्यक शिक्षक विलास पळसमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. ही वेबसाईट बनवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत एक्कलदेवी व त्यांचा भाऊ रोहन एक्कलदेवी याने मदत केली. हा कार्यक्रम शाळेच्या सुसज्ज अशा गुगल रूममध्ये करण्यात आला. या कार्यक्रमास आस्ट्रेलियावरून संकल्प- मराठी शाळेचे संस्थापक प्रसाद पाटील यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. त्यांनी शाळेच्या अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच ऑस्ट्रेलियात मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी घेत असलेल्या उपक्रमाविषयी भरभरून बोलले.
या कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या फलके, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी मेमाणे यांनी केले. माजी विद्यार्थिनी मॉर्गन अमेरिकन बँकेची व्यवस्थापक शीतल कामठे हीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.
























































