
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचा सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना आजही यश आले नाही. आज दिवसभर माध्यमांमध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या हालचालींसंदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. बुधवारी शरद पवार यांच्यानंतर अध्यक्ष कोण असेल याबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावल्याचे वृत्त सातत्याने प्रसिद्ध केलं जात होतं. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावलं नसल्याने ते नाराज झाल्याच्या बातम्याही दाखवण्यात आल्या. मात्र या सगळ्या अफवा होत्या असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “आज कोणतीही बैठक बोलावली गेलेली नव्हती आणि कोणता निर्णयही झाला नाही. पवारांनी काल घेतलेल्या निर्णयात त्यांनी अद्याप बदल केलेला नाही. त्यांनी विचार करण्यासाठी वेळ घेतला होता. अफवा नको, शांततेत त्यांना विचार करू द्या. उद्या आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू, जे होईल ते आम्हील तुम्हाला सांगू. बैठक असेल तर त्याबद्दलही कळवू.” जयंत पाटील यांच्या नाराजीच्या वृत्ताबाबत विचारले असता पटेल यांनी म्हटले की पक्षात कोणाचीही नाराजी नाहीये. जयंत पाटील हे कारखान्याच्या बैठकीसाठी पुण्याला गेले होते. पटेल यांनी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना उद्देशून आवाहन केलं की कोणीही राजीनामा देऊ नये आणि सगळ्यांनी संयम बाळगावा.
पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर घेणार का असं विचारलं असता पटेल यांनी म्हटले की, मी ही जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे पद गौरवशाली आहे, माझ्याकडे राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्ष बनण्यात मला अजिबात रस नाही. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असून त्यात फूट पडणार नाही हे अधिकृतरित्या सांगतो. पटेल पुढे म्हणाले की, उन्हाळ्यामुळे पुढील वज्रमूठ सभा थोडी लांबवावी अशी चर्चा स्टेजवरच सगळ्या नेत्यांमध्ये झाली होती. सभा लांबवण्याचा आणि शरद पवारांच्या निवृत्तीचा काहीही संबंध नाही.





























































