
- प्रसाद फाटक
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. डॉ. अनंत कुलकर्णी यांनीही याच परंपरेत मोलाचं योगदान दिले आहे. त्यांच्या विलक्षण अनुभवांचे सार म्हणजेच ‘अनंता’नुभव हे पुस्तक.
कोल्हापूरच्या डॉ. कुलकर्णींनी वैद्यकीय शिक्षण घेताना इंटर्नशिपच्या निमित्ताने मागासलेल्या भागातल्या लोकांची बिकट आर्थिक स्थिती, वैद्यकीय सुविधांची दयनीय अवस्था यांचा अनुभव घेतला. त्यातूनच मग दुर्गम भागात विनामोबदला वैद्यकीय सेवा द्यायचा विचार त्यांच्या मनात पक्का होत गेला.
निसर्गाचा वरदहस्त लाभूनही या भागात कुपोषण, रोगांच्या साथी, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव अशा अनेक समस्या होत्या. सरकारी अनास्था पाचवीला पूजलेली होती. आरोग्य पेंद्रातले आधीचे डॉक्टर गरीब रुग्णांकडून पैसे उकळत होते. डॉ. कुलकर्णी यांनी मात्र रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली, त्यांची प्रेमाने चौकशी करायला सुरुवात केली. चार प्रेमाच्या शब्दांना आसुसलेल्या वनवासींना हा सुखद अनुभव होता.
डॉ. कुलकर्णी यांनी जव्हार-मोखाडय़ातल्या दुर्गम आप्पा पटवर्धन यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आरोग्य व लसीकरण शिबिरे, मूक बधिरांसाठी वसतीगृह आणि शाळा, अपंगांसाठी कृत्रिम अवयव पुरवणे अशी असंख्य कामे केली गेली. गावांत दाईचे काम करणाऱया स्त्र्ायांसाठी ‘दाई प्रशिक्षण योजना’ राबवल्याने मोखाडा भागातील प्रसूतीकाळातील मृत्यूचं प्रमाण घटलं. गावोगाव ‘आरोग्यरक्षक योजना’ सुरू केल्यामुळे साथीच्या आजारांमध्ये मृत्युमुखी पडणाऱया लोकांची संख्या कमी झाली. अशा दुर्गम भागातल्या गरीब, परंतु प्रेमळ लोकांचे डॉ. कुलकर्णी यांना आलेले अनुभव हा पुस्तकातला अतिशय हृद्य भाग आहे.
डॉ. कुलकर्णी यांनी आपले हे कार्य विनावेतन केले. फक्त घर चालवण्यासाठी अत्यावश्यक असणाऱया मीठमिरची, वाणसामानाच्या खर्चाची तजवीज प्रगती प्रतिष्ठानकडून होत असे. एका धनिकाकडून अशाच प्रकारच्या कामासाठी घसघशीत मोबदला देण्याची तयारी दाखवली गेली, तीही डॉ. कुलकर्णी यांनी नाकारली. सात वर्षे विनावेतन काम केल्यानंतर वाढत्या वयाच्या मुलांच्या खर्चाचा ताळमेळ बसावा यासाठी त्यांनी इगतपुरीला महिंद्र पंपनीत आरोग्य अधिकारी म्हणून नोकरी धरली. हे काम करतानाही त्यांनी सेवाकार्याला अंतर दिले नाही. कर्मचारी, अधिकारी, नाशिकचे डॉक्टर्स यांचा मोखाडा-जव्हारमधल्या कामाशी परिचय करून दिला तेव्हा प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्या सर्वांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला. यातून मोखाडा-जव्हारच्या लोकांसाठी आरोग्याबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने 1989 साली व्यापक प्रमाणात सेवाकार्ये सुरू करण्यात आली तेव्हा डॉ. कुलकर्णी यांच्याकडे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ची जबाबदारी आली. मोखाडय़ाला काम करताना स्थानिक राजकारण्यांकडून डॉ. कुलकर्णींच्या कामात अडथळे आणले गेले. परंतु ‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है!’ या काव्यपक्तींना अनुसरून त्या लोकांच्या अडचणीच्या वेळीही हेच डॉक्टर धावून गेल्यावर मात्र विरोधकांचा दृष्टिकोन बदलला. आरोग्यसेवेसाठी गावांतूनच उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळेच हे समाजकार्य अधिक व्यापक झाले. पुस्तकामध्ये या कार्यकर्त्यांची नावासह आवर्जून दखल घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या समर्पण भावामुळे आरोग्य विचार गावागावांत रुजायला मदत झालीच, पण सेवेच्या नावाखाली धर्मप्रसार करणाऱया मिशनऱयांच्या आमिषांना न भुलण्याइतका स्वाभिमानही तिथे रुजला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या उत्तम शब्दांकनामुळे हे पुस्तक प्रवाही झाले आहे. हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे विचारप्रवण करणारेही आहे.
‘अनंता’नुभव
लेखक ः अनंत कुलकर्णी
प्रकाशक ः स्नेहल प्रकाशन
मुखपृष्ठ ः मोहन थत्ते
पृष्ठs ः 252, किंमत ः रु.300/-

























































