आज देशभरात मतदान, कोण होणार राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आज 18 जुलै रोजी पार पडणार असून देशभरातील 4800 खासदार व आमदार आपले मत बॅलेट बॉक्समध्ये बंद करणार आहेत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा त्यांच्यात लढत होणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी उद्या संसद भवन तसेच राज्य विधिमंडळांत मतदान पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी 21 जुलै रोजी पार पडणार असून 25 जुलै रोजी नवनियुक्त राष्ट्रपती हे शपथग्रहण करतील. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मुर्मूंना पाठिंबा दिलेले पक्ष

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम,  तेलगू देसम पार्टी, जनता दल-सेक्युलर, शिरोमणी अकाली दल, शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. एकूण 10 लाख 86 हजार 431 मतांपैकी 6.67 लाख मते ही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आहेत.

असे होईल मतदान

संसद भवन तसेच विधिमंडळात मतदान होणार आहे. या मतदानावेळी खासदार तसेच आमदारांना वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका दिल्या जातील. खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका दिल्या जातील. मतमोजणी सहज करता यावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील एका आमदाराचे मूल्य

प्रत्येक राज्यातील आमदाराचे म्ल्यू हे वेगवेगळे आहे. उत्तर प्रदेशमध्ये 408 आमदार असून एका आमदाराच्या मताचे मूल्य हे 208 आहे. तामीळनाडू आणि झारखंडमधील आमदाराच्या मताचे मूल्य  176, महाराष्ट्र 175, बिहार 173 आणि आंध्र प्रदेशमधील आमदाराचे मूल्य हे 159 आहे. छोटय़ा राज्यांतील आमदाराच्या मताचे मूल्य हे कमी असून सिक्कीममध्ये 7, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचे मूल्य 8, नागालँड 9, मेघालय 17, मणिपूर 18 आणि गोव्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे 20 आहे.