चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी 9 नंतरच भरवले जाणार आहेत. त्यासंदर्भात राज्य शासनाने आज निर्देश दिले. शिक्षणतज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून आलेल्या अभिप्रायांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळच्या सत्रातील शाळा सुरू होण्याची वेळ बदलण्याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या डिसेंबरमध्ये केली होती. त्यानुसार शासनाकडून अभिप्राय मागवण्यात आले होते. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासगी शाळा सकाळी 7 नंतर भरवल्या जातात.

आधुनिक जीवनशैली, मनोरंजनाची साधने, शहरांमध्ये उशिरापर्यंत सुरू राहणाऱया वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमानिमित्त वाजवले जाणारे कर्कश संगीत यामुळे मुले उशिरा झोपतात. सकाळी ती लवकर उठण्यासही तयार नसतात. अपुऱया झोपेमुळे मुलांवर शारीरीक आणि मानसिक परिणाम होतो. आळस कायम राहिल्याने अभ्यासासाठी आवश्यक उत्साहही त्यांच्यामध्ये नसतो. सकाळी लवकर उठून मुलांना वेळेवर शाळेत सोडण्यासाठी पालकांचीही ओढाताण होते. या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतरच शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद आहे. या निर्देशाचे पालन करण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपवण्यात आली आहे.