महाराष्ट्रातील छात्रसैनिकांनी दिल्लीत रोवला यशाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांनी केले काैतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनिस्टर्स बॅनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी सह्याद्री अतिथीगृहावर काैतुक सोहळा आयोजित केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले होते.

एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून पंतप्रधान ध्वज मिळवून महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. या सोहळ्याला क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कडक, शिस्तप्रिय आयुष्य आणि तेही विद्यार्थीदशेत, त्यामुळे हे येरागबाळय़ाचे काम नव्हे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे त्या वयात हे शिस्तीचे आव्हान घेऊन पुढे जायचे आणि त्यातही, विजेते व्हायचे हे मोठे काम आहे.

छात्रसैनिक म्हणजे विजयी सैनिक दिल्तील महाराष्ट्राची डरकाळी फोडणारे छात्रसैनिक म्हणजे आपले विजयी सैनिक आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना हा मान पटकावणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या चमूचा गौरव केला.