काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून वायनाडमधून पोटनिवडणूक लढणार आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाडची जागा प्रियंका गांधी यांच्यासाठी सोडणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गेल्याच आठवडय़ात त्यांनी लोकसभा सचिवालयाकडून कलम 240(1) अंतर्गत राजीनामा देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती मागवली होती.
राहुल गांधी यांच्या दोनपैकी एका लोकसभा मतदारसंघातील खासदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर खरगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रायबरेली हा गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. या जागेवरून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीही खासदार झाल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून सीपीआयच्या एनी राजा यांचा तब्बल 3 लाख 64 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर रायबरेलीतून ते साडेतीन लाख मतांनी विजयी झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीतून त्यांचा पराभव झाला होता. तर वायनाडमध्ये ते तब्बल 4 लाख 31 हजार मतांनी विजयी झाले होते.
उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पुनरागमन
2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पुनरागमन झाल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसने रायबरेली, अमेठी, सीतापूर, सहारनपूर, अलाहाबाद आणि बाराबंकीसह उत्तर प्रदेशातील 6 जागा जिंकल्या.
– रायबरेलीचे गांधी घराण्याशी घनिष्ठ नाते आहे. तिथल्या लोकांना आणि पक्षाला वाटते की राहुल गांधी यांनी रायबरेलीच्या जागेवरून खासदार असावे. राहुल गांधींना वायनाडच्या लोकांचे प्रेम मिळाले, पण कायदा एका जागेवरून खासदार होण्याची परवानगी देतो. तर वायनाडच्या लोकांना प्रियंका गांधी भावतात. केरळच्या लोकांना जितके राहुल गांधी आवडतात तेवढय़ाच प्रियंका गांधीही आवडतात, असे काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
– राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाची खासदारकी सोडताना वायनाडमधील जनतेचे आभार मानले. तसेच प्रियंका गांधी त्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याने आम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार, असा विश्वासही राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला दिला.
– वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळत असल्याने खूष आहे. तसेच आमचे रायबरेली आणि वायनाडच्या जनतेशी आपुलकीचे नाते आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.